हिंदू धर्मात इतके सण व उत्सव आहेत कि, सारे वर्ष कसे संपते हे कळत सुद्धा नाही. भारतीय संस्कृतीने गुणांचा गौरव केला आहे. त्यात कोणत्याच प्रकारचा भेद ठेवलेला नाही. पशु , पक्षी , प्राणी, वृक्ष यांच्या गुणांचा गौरव करून त्यांना सन्मानित केले आहे . अशा या सणांमध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त असतो ; परंतु गोकुळाष्टमी व दहीहंडी हा मुलांचा पुरूषांचा उत्सव आहे. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाला विष्णूंचा अवतार समजतात. कृष्ण भारतीयांच्या आवडते दैवत आहे. मथुरा , पुरी, गोवर्धन, वृंदावन, बनारस याठिकाणी जन्माष्टमीच्या उत्सवाचा आनंदाचा जल्लोष पाहावयास मिळतो. सर्वच लोक हा दिवस महत्वाचा मानतात. कृष्ण मंदिराबरोबरच विष्णूच्या मंदिरातही हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी पूजा, प्रवचन, भजन, कीर्तन, मंत्रघोष अशा विविध कार्यक्रमांनी दिवस रात्र कशी संपते, हे कळतही नाही. नवमीला ‘ गोविंदा आला रे , आला ‘ म्हणत दहीहंड्या फोडल्या जातात. हंडीचे खापर या गाईच्या गोठ्यात पुरून ठेवले की , गाय जास्त दुध देते अशी भावना आहे.
कृष्ण गोकुळात दह्या-दुधाने वाढला. गोर गरीब लोकांच्या व सवंगड्यांच्या बरोबर खेळला. सुदामाचे पोहे आवडीने खाल्ले म्हणून नवमीला दही पोह्यांचा प्रसाद वाटला जातो. ‘ गोविंदा, रे गोपाला ‘ च्या तालावर तरुण मुले नाचत गात मिरवणूक काढतात.
भगवत गीता हे जीवनाचे सार आहे. 5000 वर्ष होऊन सुद्धा श्रीकृष्ण विसरला जात नाही. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा श्रीकृष्णाची आठवण होते . दुर्जनांचा नाश,सज्जनांचे रक्षण व मानव धर्माची स्थापना करणाऱ्या या भगवंताला लोक मनोभावे पूजतात.