कोरोनायन : एक संवेदनशील प्रवास

कोरोनायन : एक संवेदनशील प्रवास
IMG 20220813 WA0019

नुकताच श्री जयराम धोंगडे लिखित 'कोरोनायन' हा कवितासंग्रह वाचण्यात आला.त्यांचा हा दुसरा कवितासंग्रह.कवितासंग्रहाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात आले असेल की हा कवितासंग्रह कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लिहिण्यात आला आहे.असे असले तरी अगदी सर्व कविता काही कोरोनावर नाहीत तर त्या कोरोना काळात लिहिलेल्या आहेत.पण कोरोना ह्या महामारीने मानवाला दाखवून दिले होते की मानवाचे जीवन किती क्षणभंगुर आहे.आज आपण कोरोनाच्या विळख्यातून सुटलेलो असलो तरीही तो काळ आठवताच अंगावर शहारे उमटतात.त्या काळातील माणसाची जगण्याची धडपड,आशा,निराशा आणि आपल्या प्रिय व्यक्तींना गमावण्याचे दुःख याबाबत कवीने अतिशय संवेदनशील मनाने निरीक्षण केल्याचे आपणास पानोपानी जाणवत राहते.

आपल्या पहिल्याच कवितेत कवी म्हणतात,

” जाऊ नको म्हणलं तर बाहेर जाता
याला भेटता,त्याला भेटता
दुरून दुरूनच बोललो म्हणता
भ्या राव! जरा कोरोनाला
का मानेने उगी डोलता
अन बोललं की बोललं म्हणता !”

कोरोनाचा काळ आठवून बघा.’दो गज की दुरी’ आणि लोकांची मजबुरी किंवा मुजोरी आठवून बघा.बाहेर जाणारच नाही तर खाणार काय?असा सवाल असणारे काही लोक एकीकडे तर उगीच बाहेर पडून सळसळणारे,वळवळणारे दुसरीकडे.ह्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांना उद्देशून कवी वरील उद्गार काढतात.अशा लोकांना आपण महाभयंकर आजार पसरवत आहोत ह्याचा थोडासाही अपराधबोध नसायचा.ते आपले सर्व नियम चुकवून बिंदास बाहेर पडायचे.तर अशा लोकांना कानपिचक्या कवी देतात. ह्या लोकांना घरातच राहण्याची तंबी देतात.शिवाय ह्या कवितेत एक प्रकारचा नाद शेवटपर्यंत टिकून राहतो.मराठवाड्यातील बोली भाषेतील शब्दांचा कवी चपलखपणे वापर करतात.लोकांना त्यांच्याच भाषेत सांगितले की पटकन समजते म्हणून त्यांच्याच बोली भाषेचा वापर करून कवी लोकांना त्यांच्या बेजबाबदार वागण्याची आठवण करून देतात.

"नाही केली होळी,ना पुरणाची पोळी
अशीच गेली बाई,मागची दिवाळी
गेले सारे सण,ना आनंदा उधाण
बाहेर पडायचं होतया मन,पण
बाय बाय बाय करावं काय?
काही केल्या कोरोना जातच नाय!"

अशा ओळींतून कवी मानवी मनाची हुरहूर व्यक्त करतात.एकीकडे महामारीच्या प्रचंड दहशतीखाली वावरत असताना दुसरीकडे मनाला उभारी देणारे,ऊर्जा देणारे आपले प्रिय सण उत्सवही माणसाला साजरे करता येत नव्हते.त्यातून मग ही अवदसा कधी एकदाची निघून जाईल आणि कधी आपलं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं सुरळीत होईल याचीच हुरहूर मनाला लागून राहिली होती.ह्याच मानवी भावनेचा धागा अलगद पकडत कवी वरील उद्गार काढतात.
संपूर्ण कवितासंग्रह बहुरंगी,बहुढंगी कवितांनी नटलेला आहे.विविध सामाजिक,मानसिक,भावनिक विषयांना कवीने हात घातला आहे.मुळात जयराम धोंगडे हे गझलकार आहेत त्यामुळे त्यांच्या सगळ्याच कवितांना एक लय आहे,एक वेगळाच नाद आहे आणि शब्दांत सहजता आहे. आता त्यांची ‘थोडं चूप राहावं यार’ हीच कविता पहा ना !

शब्दाला देता शब्द
कलहाचे उजळे प्रारब्ध
दुरावती मग नाती
विरहात लोपटे मती
म्हणून शब्दाला जपावे फार
थोडं चूप राहावं यार !

ह्या कवितेत ‘थोडं चूप राहावं यार’ ह्या शब्दांची नादपूर्वक पुनरावर्ती होत राहते.अशा अनेक कविता या कवितासंग्रहात आहेत.नाद,लय,शब्दांचा लाडीवाळपणा जोपासतानाच आशय आपला हात सोडत नाही,हे विशेष!

“भाकरीच्या मागे लागून ती कमावणे
म्हणजे नसतं सुख राजा !
कमावलेली भाकरी कुटुंबात वाटून खाणे
हेच असतं सुख,त्यातच मजा !”ह्या ओळी 'सुख म्हणजे काय असतं'ह्या कवितेतील आहेत. Sharing is caring असं लहान मुलांना आपण शिकवत असतो.त्याच प्रेमळ भावनेने आपले बोट पकडून कवी आपल्याला समजावत आहेत की कमावलेल्या भाकरीला मुळी किंमतच नाही जोपर्यंत आपण ती भाकरी इतरांसोबत वाटून खात नाही.याच कवितेत ईर्ष्या,प्रेम,माया,वात्सल्य,मोह अशा विविध भावनांना कवी गोंजारतात.

” जगा गडे हो आपले जीवन
मनी नसावी कसली अडचण
जे जे आवडे आपुल्या मना
पार पाडाव्या त्या संकल्पना
मस्त जगावे ते बिनधोक..
सोडून द्या,काय म्हणतील लोक ?”

वरील ओळींतून कवी आपल्याला जीवनाचे किती मोठे तत्वज्ञान सांगून जातात! लोक काय म्हणतील ह्या भीतीपोटी आपण स्वतःसाठी जगणेच विसरून जातो.आपल्या कला,आपल्या क्षमता,आपल्या ईच्छा यांचा गळा घोटून टाकतो आणि एक समाजमान्य सरळ रेषा आखून अख्ख आयुष्य त्याच वाटेवरून चालतो.कवी ह्या कवितेतून लोक काय म्हणतील याचा विचार न करता बिनधोकपणे जगून घेण्याचा सल्ला देतात.

“इथे घराला,घराला चिकटून घर
शेजाऱ्यांनी,शेजाऱ्याला नसते खबर
नसे जीवाला,जीवाला त्यांचा आधार
जित्या माणसाची येते चीड
कसं सुटावं जीवनाचं कोडं ?
असते मनाला शहराची ओढ”

‘कसं सुटावं जीवनाचं कोडं’ ह्या कवितेतून कवी चकचकीत शहराचा विद्रुप चेहरा उघड करतात.कोणालाही कोणाची गरज नसल्याचा आव आणत आपल्याच धुंदीत पळणारं शहर माणसाच्या संवेदना बोथट करत,भावभावनांना चिरडत निघालेलं आहे तरीही त्याच शहराची ओढ माणसाला का असावी बरे? हे न सुटणारं कोडं कवीना सुद्धा पडलंय.शहराच्या गर्दीत हरवणारी ग्रामीण पापभिरुता ह्या कवितेतून कवी अतिशय उत्कटतेने आणि पोटतिडकीने मांडताना दिसतात.
आणखी एका कवितेत लेखक गावाची महती सांगताना हाच विषय ऐरणीवर आणतात.पण यावेळी गाव आणि ग्रामीण जीवनाचे सौंदर्य टिपत ते म्हणतात,

” गड्या आपुला गाव बरा,नित्य होता स्नेहाचा झरा
मनी आता एकचि ध्यास,गावाची लागो आस !

ग्रामीण जीवन आणि त्याची निरागसता मांडताना कवी गावगाड्याचे सुंदर वर्णन करतात.तेथील व्यवसाय विभागणी आणि त्याला समाजाची असलेली मान्यता मांडताना कवी जुन्या जाती व्यवस्थेचे वास्तव मांडतात.
अशा अनेक थेट अंतःकरणाला भिडणाऱ्या कविता श्री जयराम धोंगडे सरांनी ह्या कवितासंग्रहात मांडल्या आहेत.ह्या कवितांचा आस्वाद नक्कीच घ्यायला हवा..

गौसपाशा शेख तलासरी(पालघर) 8412070716

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *