रमजान ईद
RAMJAN EID – FESTIVAL OF JOY
प्रसन्नता किंवा आनंद म्हणजे ईद. हा मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण असून रमजानचा महिना संपल्यानंतर, पण शब्बाल महिन्याच्या पहिल्या तारखेस साजरा केला जातो. या सणाचा व चंद्राचा घनिष्ट संबंध आहे. कारण ईदचा निर्णय चंद्र दर्शनानंतरच केला जातो. उपासातून मुक्तता व आनंदपूर्तीची शुभसूचना चंद्रावर अवलंबून असते. त्यामुळे ‘ईद का चाँद’ हा वाक्प्रचार बनला आहे. पूर्वी ईद दोन दिवस साजरी होत असे. इस्लामच्या आधी ‘ईद जहालियात’ नावाची ईद होत असे.
या दिवशी प्रत्येक मुस्लीम कुटुंबात उत्साहाचे वातावरण असते. तीन-चार दिवस अगोदरच घरे स्वच्छ, टापटीप करून ठेवलेली असतात. सर्वत्र सुगंधी वातावरण असते. घरातील सर्व मंडळी नवीन कपडे घालतात. नातेवाईक – मित्रांच्या घरी जाऊन आनंदाने भेटीगाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.
या दिवसाचे दुसरे महत्त्व म्हणजे हा दिवस दान- धर्म करण्यासाठी आहे. ज्याच्याजवळ साडेसात तोळे सोने किंवा बावन्न तोळे चांदी असेल त्याने दान-धर्म करणे आवश्यक आहे. श्रीमंत-गरीब कुणीही असो, प्रत्येकास १।।। किलो गहू आणि २।।। किलो जवा इतकीच किंमत द्यावी लागते. हे दान नातेवाईक, शेजारी किंवा गरीब माणसाला दिले जाते. हा सण सर्वांनी साजरा करावा हा त्यामागील हेतू आहे.
दया, संयम, समानता, करुणा, स्नेह व ममत्व इत्यादींचा संदेश ईद घेऊन येते. आपल्या घरातील माणसांशी, नातेवाईकांशी, मित्रपरिवार व शेजाऱ्यांशी व्यवहार कसा ठेवावा व एकमेकांच्या सुख दुःखात कसे सहभागी व्हावे, हाच ईद या सणाचा खास संदेश आहे
अशा या विविध सणांमुळेच भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे.