केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१ चौथा मजला, खोली क्र. ४३९, विस्तार इमारत हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा मार्ग, मुंबई ४०००३२ दिनांक : २७ सप्टेंबर, २०२३.
संदर्भ :- १. शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्रमांकः संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि – १, दि.०१.१२.२०२२.
२. शासन शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि -१, दि.०९.०३.२०२३.
प्रस्तावना:- केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेबाबत मा. न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका व प्राप्त निवेदने, तसेच शासकीय कर्मचारी यांचेकरीता असलेल्या अर्हता या सर्व बाबींचा विचार करता केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेमधील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ अनुसार शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील सुधारित करण्यात आलेली परिच्छेद क्र. ५.१ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता पदवी परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक असलेली अट रद्द करण्याबाबतची, तसेच शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र. ५.२ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता विहित करण्यात आलेली किमान ५० वर्ष वयाची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याअनुषंगाने केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने आवश्यक अर्हतेबाबत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे:-
शासन निर्णय:-
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित संदर्भ क्र. २ येथील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ याअन्वये अधिक्रमीत करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१ ५.२ व ६ येथील तरतूदी यान्वये वगळण्यात येत आहेत. परंतु उर्वरित तरतूदी यापुढे लागू राहतील.
०२. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीकरीता पुढीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात येत आहे:-
२.१ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड:-
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
२.२ पदोन्नतीने नियुक्तीसाठी:-
ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.
०३. केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी.
०४. सदर शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०९२७१२२३५५३४२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
TUSHAR VASANT MAHAJAN
NOTICE
DAMRUNGANT
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र राज्य


