
आपण कुठल्याही कार्याचा शुभारंभ विघ्नहर्ता गणपतीच्या स्मरणाने करतो. त्यावेळी आपण श्रीगणेशा केला, असेही म्हणतो. गणपती ही देवता वेदकाळात ही पुजली जात होती. आपल्या धर्मात अनेक देवदेवता आहेत. त्यात काही प्राचीन तर काही अर्वाचीन आहेत. त्यात श्री गणेश विष्णु ,शंकर, भवानी देवी व नारायण म्हणजे सूर्य या पाच देवतांनी आहे. या पंच देवता भारतीय संस्कृतीच्या प्रतिनिधी देवता मानल्या जातात. श्री गणेश फार प्राचीन देवता असून वरील देवता वैदिक व अवैदिक समाजाचा मिलाफ साधणाऱ्या पुण्य देवता आहेत. श्री गणपती हे भारतीय संस्कृतीचे मंगलमय प्रतीक आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीस श्री गणेशाचे आगमन होते म्हणून या चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात .ब्राह्मणापासून शुद्रा पर्यंत सर्वच वर्णाचे लोक या देवतेची पूजा करतात. या देवतांची पूजा विघ्नहर्ता मंगलमूर्ती म्हणून केली जाते. त्यांच्या कृपा प्रसादाने सुबुद्धी व सुविधा यांचा लाभ होतो असे मानतात. शुभ कार्यात विघ्ने येऊ नयेत,कार्य निर्विघ्न पार पडणे यासाठी कार्याच्या आरंभी विघ्नहर्त्या गजाननाची प्रार्थना केली जाते. गणेश हा गुणांची, विद्येची देवता आहे. तो ज्ञानमय आहे. त्याच्या मूर्तीत सारे शब्द ब्रह्म एकवटलेले असून अठरा पुराणाचे अलंकार धारण केले आहे.
अशा या गणेशाचे रूप आगळे वेगळे आहे. त्याला हत्तीचे डोके आहे. याचाच अर्थ असा की तो विद्येचा सागर व श्रेष्ठ विद्वान आहे. त्याचे कान सुपा येवढे मोठे आहेत याचा अर्थ तो बहुश्रुत आहे. डोळे बारीक आहेत म्हणजे कोणत्याही गोष्टींचे निरीक्षण बारकाईने तो करतो. इतकी विविधता कोणत्याही देवतेत आढळत नाही.