महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिले आहेत. त्यामुळे लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
एमपीएससीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून प्रस्तावित असून, त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत सर्व विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे परिपूर्ण मागणीपत्र सादर करावे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
लिपीक-टंकलेखक पदासाठी खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार झाल्याचे आढळले. त्यानंतर स्पर्धा परीक्षार्थीनी संबंधित भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फतच घेण्याची मागणी केली होती. आता ही भरतीप्रक्रिया एमपीएससीमार्फतच घेण्यात येणार असल्यामुळे ती पारदर्शी होईल, असा विश्वास स्पर्धा परीक्षार्थीनी व्यक्त केला आहे
